संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान जेजुरीजवळील बेलसर फाटा परिसरात वारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव ट्रक घुसून झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. या दुर्घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक वारकरी जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी तात्काळ दखल घेत जेजुरी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. जखमी वारकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच कुटुंबीयांना धीर देत शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला.
रुग्णालयात डॉक्टर, आरोग्य अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा करत सुनेत्रावहिनी पवार यांनी प्रत्येक जखमीवर सर्वोत्तम उपचार करण्यात यावेत, उपचारात कोणतीही हलगर्जी होऊ नये तसेच आवश्यक औषधे, तज्ज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश दिले.
दुर्घटनेतील जखमी वारकऱ्यांना आवश्यक ती सर्व शासकीय मदत, आर्थिक सहाय्य आणि वैद्यकीय सुविधा त्वरित मिळाव्यात, यासाठी संबंधित प्रशासनाने समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. गंभीर जखमी वारकऱ्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.
या दुर्दैवी घटनेबाबत शोक व्यक्त करत सुनेत्रावहिनी पवार म्हणाल्या की, वारकरी ही महाराष्ट्राच्या संत परंपरेची ओळख असून त्यांच्या सुरक्षिततेला शासन सर्वोच्च प्राधान्य देत आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पालखी मार्गावरील सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचा सखोल आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात येतील.
दरम्यान, अपघाताची चौकशी सुरू असून संबंधित जबाबदारांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या घटनेमुळे पालखी सोहळ्यावर शोककळा पसरली असून राज्यभरातून मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली आणि जखमींच्या लवकर प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना व्यक्त केली जात आहे.