शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी शेती आणि साखर उद्योगाने बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक आहे, अशी महत्त्वपूर्ण भूमिका उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी मांडली. शेतीचे अर्थकारण मजबूत करण्यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होणे आणि त्यांना अधिक आर्थिक लाभ मिळणे, याला प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, सोमेश्वरनगर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या. शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असून शेतकरी सक्षम झाला तर गावाची आणि पर्यायाने राज्याची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होते, असे सुनेत्रावहिनी पवार यांनी सांगितले. शासन, शेतकरी, सहकारी संस्था आणि साखर उद्योग यांनी समन्वयाने काम करून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI, आधुनिक सिंचन पद्धती, यांत्रिकीकरण, माती परीक्षण, सुधारित वाणांची निवड आणि अचूक पीक नियोजन यांचा वापर वाढवण्याची गरज सुनेत्रावहिनी पवार यांनी अधोरेखित केली. या तंत्रज्ञानामुळे उत्पादनक्षमता वाढवण्यासोबतच उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होऊ शकते. बदलते हवामान आणि वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता शेती अधिक नियोजनबद्ध आणि तंत्रज्ञानाधारित करण्याची दिशा महत्त्वाची ठरणार आहे.
साखर उद्योगाच्या विकासाबाबतही सुनेत्रावहिनी पवार यांनी व्यापक दृष्टिकोन मांडला. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत साखर उद्योगाचे महत्त्व लक्षात घेता कारखान्यांनी केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न राहता इथेनॉल, बायोगॅस, CNG, सेंद्रिय खत आणि इतर मूल्यवर्धित उत्पादनांकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अशा माध्यमातून कारखान्यांच्या आर्थिक क्षमता वाढवण्यासोबतच शेतकरी सभासदांना अधिक लाभ मिळवून देण्याच्या संधी निर्माण होऊ शकतात.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजाचाही सुनेत्रावहिनी पवार यांनी सकारात्मक उल्लेख केला. आर्थिक शिस्त, कार्यक्षम व्यवस्थापन आणि शेतकरी हिताला दिलेले प्राधान्य यामुळे कारखान्याने सहकार क्षेत्रात विश्वास निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले. सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, अधिकारी आणि व्यवस्थापन यांच्या सामूहिक योगदानातून संस्थेची प्रगती होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची परंपरा कायम ठेवत सहकारी संस्थांनी परिसराच्या सर्वांगीण विकासातही भूमिका बजावावी, अशी अपेक्षाही सुनेत्रावहिनी पवार यांनी व्यक्त केली. त्यामुळे शेती, साखर उद्योग आणि ग्रामीण विकास यांना एकत्रितपणे पुढे नेण्याचा व्यापक दृष्टिकोन त्यांच्या भूमिकेतून समोर आला आहे.