दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे Deputy CM पवन कल्याण यांच्या वैयक्तिक आयुष्यात पुन्हा एकदा मोठे वादळ आले आहे. पवन कल्याण आणि त्यांची तिसरी पत्नी ॲना कोनिडेला यांनी १३ वर्षांच्या संसारानंतर परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत या निर्णयाची माहिती दिली असून या बातमीमुळे मनोरंजन आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
पवन कल्याण आणि रशियन नागरिक असलेल्या ॲना यांची २०११ मध्ये एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ओळख झाली होती. त्यानंतर २०१३ मध्ये दोघांनी लग्न केले. या दाम्पत्याला दोन लहान मुले आहेत. विभक्त होताना दिलेल्या निवेदनात त्यांनी मुलांच्या संगोपनाची जबाबदारी एकत्र सांभाळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. वैवाहिक नाते संपले तरी आमची मैत्री कायम राहील, असेही त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.
पवन कल्याण यांचे हे तिसरे लग्न होते. याआधी १९९७ मध्ये त्यांनी नंदिनी यांच्याशी विवाह केला होता, ज्यांचा २००८ मध्ये कायदेशीर घटस्फोट झाला आणि त्यांना ५ कोटी रुपये पोटगी देण्यात आली होती. त्यानंतर २००९ मध्ये अभिनेत्री रेणू देसाई यांच्याशी त्यांनी दुसरे लग्न केले, पण २०१२ मध्ये तेही नाते संपले. त्यावेळी ४० कोटी रुपयांच्या तडजोडीची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती.
आता तिसऱ्या पत्नीपासूनही विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याने पवन कल्याण यांच्या खासगी आयुष्याविषयी पुन्हा एकदा विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. ॲना कोनिडेला यांना किती पोटगी दिली जाणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या निर्णयामागचे मूळ कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी सोशल मीडियावर या विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे.