दिवाळीचा सण कुटुंबीयांसोबत साजरा करण्यासाठी मुंबईकर गावाकडे किंवा पर्यटनासाठी जात असताना बंद घरांवर चोरट्यांची नजर पडत असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांच्या अनुपस्थितीचा फायदा घेण्यासाठी घरफोडी करणाऱ्या टोळ्या आधीपासूनच सक्रिय झाल्याचे दिसत आहे. पवईतील हिरानंदानी गार्डन्स आणि अंधेरीतील सात बंगला परिसरातील चोरीच्या घटनांनी उच्चभ्रू इमारतींमधील सुरक्षेच्या वाभाड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या ९ महिन्यांच्या काळात रातच्या वेळी घरफोडी करून चोरी केल्याप्रकरणी ६२४ गुन्हांची नोंद झाली आहे. तर दिवसा घरफोडीच्या १०९ घटना घडल्या आहेत. पवईतील एका १७व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये चोरट्यांनी २५ लाख ९ हजार रुपयांचा ऐवज लांबवला, ज्यामध्ये कुलूप न तोडता चोरी झाली आणि सीसीटीव्ही देखील बंद होते. तसेच अंधेरीतील एका निर्मात्याच्या घरातही परकीय चलन, सोन्याचे दागिने आणि महागडे घड्याळ असा ऐवज परदेशात गेलेल्या काळात चोरला गेला.
सुट्टीसाठी घराबाहेर पडल्यानंतर अनेक जण सहलीचे फोटो, व्हिडीओ आणि आपण कुठल्या भागात आहोत याची माहिती सोशल मीडियावर ताबडतोब शेअर करतात. मात्र, अशा पोस्टमधून मालक घरापासून दूर असल्याची माहिती उघड होते, ज्याचा फायदा चोरटे घेऊ शकतात. त्यामुळे प्रवासाचे फोटो आणि लोकेशन ताबडतोब शेअर न करता घरी परतल्यावर पोस्ट करण्याचा मोलाचा सल्ला पोलिसांकडून दिला जात आहे.
गावी किंवा पर्यटनासाठी जाताना घर किती दिवस बंद राहणार आहे याची माहिती विश्वासू शेजाऱ्यांना देणे गरजेचे आहे. परिसरामध्ये संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना कळविण्याची विनंती सोसायट्यांनी करावी आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. सोसायट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे नियमित सुरू आहेत का आणि अनोळखी व्यक्तींची नोंद घेतली जाते का, याची खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.