ठाण्यातील रहेजा गार्डन भागातील १७ मजली रहेजा कार्लाइन इमारतीला दिवाळीच्या पहिल्या दिवशी भीषण आग लागल्याची घटना घडली. या इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून सुरू झालेली ही आग पाहता पाहता १४ व्या मजल्यापर्यंत पसरली आणि मोठा धोका निर्माण झाला. आगीच्या या दुर्घटनेमध्ये वरच्या मजल्यावर अनेक लोक अडकून पडले होते, ज्यामुळे एकच खळबळ उडाली.
या आगीची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दल आणि महानगरपालिकेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले आणि इमारतीत अडकलेल्या ५० रहिवाशांना तसेच त्यांच्या पाळीव प्राण्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. आगीमुळे धूर झाल्याने लिफ्ट बंद होती, पण जवानांनी शिडी आणि स्ट्रेचरचा वापर करून सर्व नागरिकांना वाचवले.
घटनास्थळी Deputy CM एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक आणि आमदार निरंजन डावखरे यांनी भेट देऊन नागरिकांना धीर दिला. मदतकार्यात अत्याधुनिक ड्रोनचा वापर केल्यामुळे अडकलेल्या लोकांचा अचूक शोध घेणे शक्य झाल्याचे सांगण्यात आले. वेळीच मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे नागरिकांनी मान्य केले.
या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात हवेत उडवणारे रॉकेट व तसम फटाक्यांच्या वापरावर ८ जानेवारी २०२७ पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी हा आदेश जारी केला असून रहिवासी भागात अशा प्रकारच्या फटाक्यांमुळे होणाऱ्या अपघातांना प्रतिबंध घालणे गरजेचे ठरले आहे.